मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षणाचा पेच अद्याप सुटलेला नसून त्यावर मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक आणि मंत्र्यांमधील शाब्दिक वाद रंगलेला देखील पाहायला मिळाला. हा वाद आता थेट राज्यपालांकडे पोहोचला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची तक्रार केली.राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे. हे दोन्ही नेते मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांचे निवदेन राज्यपालांना दिले. यावेळी शिष्टमंडळाने छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची देखील तक्रार केली. दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. मात्र आरक्षणाचा पेच अद्याप न सुटल्याने मराठा समाजातील तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सूर मराठा समाजातून येताना दिसत आहे. मात्र याला छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा नेत्यांमधील ही शाब्दिक चकमक काही कमी होताना दिसत नाही.