मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.बाळासाहेब थोरात हे रविवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री,काँग्रेस विधिमंडळ गट नेते शिवाय प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने पक्षाला हवा तसा वेळ देणे त्यांना जमत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे दुसऱ्याच्या हातात दिली जाणार, असे बोलले जात आहे. तर बाळासाहेब थोरात हे देखील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी उद्या मंगळवारी काँग्रेसची बैठक बोलावली आहे. बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षावर चर्चा होण्याची शक्यवता वर्तवली जात आहे. नुकतेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांना देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्षानंतर आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली ही सुरू झाल्याचे दिसत आहे.
बाळासाहेब थोरात हे दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. मात्र या चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर कोणाकडे प्रदेशाध्यक्षपदाची कमान दिली जाणार हा आता चर्चेचा विषय बनला आहे. यासाठी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासह नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत असल्याची माहिती आहे. मात्र हायकामांडकडून नेमक्या कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.