मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरुद्ध धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते.ईडी,सीबीआय मागे लावले जाते.पण एमआयएम,वंचित आघाडी यांच्यावर ईडी का लागत नाही ? असा खडा सवाल माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. तसेच ‘एमआयएम आणि वंचितमुळे भाजपाला फायदा आहे. ते काँग्रेसची मते खातात आणि भाजपला निवडून देतात आणि भाजप द्वेष आणि जातीयवाद पसरविते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाच्या मुहूर्तावर काँग्रेस नेते शिवकुमार लाड यांच्या वडाळा, प्रभाग क्रमांक २०१ येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते रविवारी झाले. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बेस्ट कमिटी सदस्य राजेश ठक्कर, कार्यालयीन प्रभारी कुतुबुद्दीन सय्यद, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एकनाथ गायकवाड यांनी भाजपाकडून होणाऱ्या ईडी, सीबीआयच्या राजकीय वापरावर कडाडून टीका केली. ‘संविधानामुळेच मी पंतप्रधान झालो असे मोदी सांगतात, भाषणात डॉ. आंबेडकरांचे नाव घेतात आणि काम मात्र संविधानाच्या विरुद्ध करतात. त्याविरुद्ध आज कोणताही पक्ष, कोणताही नेता लढताना दिसत नाही. फक्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे लढत आहेत. म्हणून राहुल गांधी यांच्या बाजूने उभे राहा. सर्वाना सोबत घेऊन जाणारी पार्टी फक्त काँग्रेसच आहे हे जगाला दाखवून द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले. ‘वडाळा येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील,’ अशी माहिती यावेळी शिवकुमार लाड यांनी दिली. ‘या कार्यालयात पक्षाचे मंत्री आणि पदाधिकारी जनतेला प्रत्यक्ष भेटतील. त्यामुळे विभागातील समस्या तातडीने मार्गी लागतील. अशाच प्रकारे मुंबईत प्रत्येक वार्डमध्ये संपर्क कार्यालय सुरु करून जनतेशी संपर्क साधला जाणार आहे. पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे, असेही शिवकुमार लाड यांनी भाषणात सांगितले.