शिवसेनेचे हिंदुत्ववादी मतदान कुठे गेले ? विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील मतदानाचा व निकालाचा अभ्यास केला तर येथील मतदारांनी भाजपला चांगल्या प्रकारचे मतदान केले आहे. कारण गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षिरसागर यांना सुमारे ६९ हजार इतके मतदान झाले होते. तसेच सुमारे ९१ हजार मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या उमदेवाराला मिळाली होती. यंदाच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांमध्ये फक्त ५ हजार मतांची वाढ झाली आहे. मग शिवसेनेचे हिंदुत्ववादी मतदान कुठे गेले असा सवाल करतानाच ही मते नक्कीच भाजपा उमेदवाराच्या पारड्यात पडली आहेत असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला. तसेच या पोटनिवडणुकीत आम्ही थोडे फार कमी पडलो असलो, तरीही त्या कारणांचा शोध पक्ष पातळीवर नक्कीच घेण्यात येईल आणि त्यादृष्टीने अभ्यास करुन हा १८ हजार मतांचा फरक आम्ही निश्चितपणे भरुन काढू व २०२४ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप विजयाचा पताका फडकावेल असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, या पोट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला जवळ जवळ ७७ हजार मते मिळाली व फक्त १८ हजार मतांनी आमचा पराभव झाला आहे. हा पराभव आम्ही स्वीकारत आहे. महाराष्ट्रात एखाद्या मतदारसंघातील उमेदवाराच्या निधनामुळे जेव्हा पोटनिवडणुक लागते व त्या मतदारसंघातून जर त्या दिवंगत उमदेवाराची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असेल तर तेथील मतदार त्यांना मतदान केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमदेवाराला सहानुभूती होती तसेच सत्ता पैसा याचबरोबर संस्थात्मक यंत्रणाही होती. तसेच या सर्वांना भाजपाची इतकी भीती होती की, ही पोटनिवडणुक हरल्यास महविकास आघाडी सरकारच्या स्थितरतेवर परिणाम होईल. म्हणूनच तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढले आणि सगळे पक्ष एकत्र असतानाही अवघ्या आठ हजाराचा फरक राहिला आहे हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

गेल्या काहि महिन्यात दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुका पार पडल्या. पंढरपूरमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाली, तर देगलूरमध्ये प्रथमच निवडणुक लढविताना भाजपच्या उमदेवाराच्या मताधिक्यात वाढ झाली. तसेच कोल्हापूर उत्तर मध्येही आम्हाला ७७,४२६ इतके मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. आमचा पराभव झाला असला तरी येथील जनतेने भाजपवर विश्वास दाखविला आहे. येथील मतदारांनी येथील दबाव, दंडेलशाही, दादागिरी तसेच प्रलोभनं झुगारून भाजपला पाठबळ दिले त्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करतो असेही दरेकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारलाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची भीती वाटत असावी

मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी आपल्याकडे म्हण आहे. मला वाटतं राष्ट्रपती राजवट लावण्यासदृश्य परिस्थिती या राज्यात आजच निर्माण झाली आहे. अराजकता मोठ्या प्रमाणावर आहे, सरकारचे मंत्री जेलमध्ये आहेत, कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. एसटी कर्मचारी आत्महत्या करतात, राज्याची आर्थिक परिस्थिती दिवाळखोरीसारखी आहे. ऊर्जा खात्याकडे कोळसा उपलब्ध नाही म्हणून चार-पाच दिवसांनी राज्य अंधकारात येईल अशी स्थिती आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी रोज भीती महाविकास आघाडीला वाटत आहे आणि संजय राऊत या महाविकास आघाडीचे कर्ते सवरते असल्यामुळे तो संभाव्य धोका अगोदरच त्या ठिकाणी बोलून त्यावर शिक्कामोर्तब करत असावेत असे दरेकर यांनी स्पष्ट केले.जर भाजपचा डाव असता तर यापूर्वीच भाजपने जबरदस्तीने राष्ट्रपती राजवट लावली असती, परंतु आपल्या देशामध्ये अशा प्रकारची जोर जबरदस्तीने राष्ट्रपती राजवट लावता येत नाही. राष्ट्रपती राजवटीच्या सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर त्याठिकाणी केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावत असते, परंतु त्यापूर्वी तेथील स्थितीचे मूल्यमापन करण्यात येते आणि राष्ट्रपती राजवट लागू शकते. परंतु येथे आपण पक्षीय द्वेषातून किंवा विरोधक म्हणून अशा त्यांच्या कारवाया होत नसतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमुख्यमंत्र्यानी निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना केली होती; शरद पवारांचे बारकाईने लक्ष होते
Next articleभाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई !