प्रदेशाध्यक्ष पदासाठी तरुण नेतृत्वाला संधी द्या,राजीनाम्याच्या वृत्तावर थोरातांनी मौन सोडले

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारा असल्याची चर्चा कालपासून सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी दुसऱ्या कुणावर तरी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याची तयारी पक्षश्रेष्ठी करत असल्याचे बोलले जात होते. मात्र आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा स्वतः बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राजीनाम्याचे वृत्त कुठून आले माहीत नाही, परंतु आपण राजीनामा दिलेला नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या दिल्लीवारीमुळे ते लवकरच आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा काल दिवसभर माध्यमांत होती.

राजीनाम्याच्या चर्चेवर बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्याकडे सोपवण्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री, विधिमंडळ काँग्रेस नेता अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो. इतक्या सर्व जबाबदाऱ्या एकत्र असणे ही देखील चर्चा होऊ शकते. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आणखी कुणावर द्यावी, असे जर पक्षश्रेष्ठींना वाटत असेल तर त्यासंदर्भात त्यांनी निर्णय घ्यावा. तरुण नेतृत्वाला संधी द्या. पुढच्या पिढीलाही अनुभव देता यावा या दृष्टिकोनातून तरुण माणसाला संधी द्यावी, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिका यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मांडली.
यापूर्वीच पक्ष श्रेष्ठींशी यासंदर्भात माझी चर्चा झाली असल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेस पक्षात व्यक्तिगत नाराजी असण्याचे कारण नाही. आपण सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. कोणतीही गटबाजी आम्ही ठेवलेली नाही. परंतु एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या याची चर्चा निश्चितच होऊ शकते. तर जबाबदारी वाटून देण्यात आपल्याला काही हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यावरही आपली नाराजी नसल्याचे थोरात यांनी सांगितले. अत्यंत मनापासून काम करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यावर नाराजी नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष पदाबाबत जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत सध्या काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासह नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत असल्याची माहिती आहे.

Previous article‘मुंबई मा जलेबी ना फाफडा,उद्धव ठाकरे आपडा’,मनपा ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेने कसली कंबर
Next articleखंडणीचा गुन्हा राजकीय षडयंत्राचा भाग,गिरिश महाजन यांच्याकडून आरोपांचे खंडन