खंडणीचा गुन्हा राजकीय षडयंत्राचा भाग,गिरिश महाजन यांच्याकडून आरोपांचे खंडन

मुंबई नगरी टीम

जळगाव : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा गुन्हा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. परंतु आपल्याविरोधात दाखल केलेला खंडणीचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे, असे म्हणत गिरीश महाजन यांनी आरोपांचे खंडन केले आहे. त्याचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहित असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे. या तीन वर्षांमध्ये अॅड . विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावासा वाटला नाही का ?, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. विजय भास्कर स्वतः मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्यांचा या मागचा हेतू स्पष्ट होतो, असे महाजन म्हणाले. या प्रकरणी आपण स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कधी व कुठे घडला? मारहाण केलेले लोक त्यावेळी कुठे होते ? या सर्वांच्या चौकशी मागणी केली असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
या संदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की, मराठा प्रसारक मंडळ ही मराठा समाजाची संस्था आहे. ती केवळ मराठा समाजापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे इतर समाजाचे लोक या कार्यकारिणीवर येऊ शकत नाही.मी ओबीसी असून माझे सहकारी इतरसमाजाचे लोक आहेत. त्यामुळे ते या संस्थेचे सदस्य कसे होतील? ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न आम्ही केला हे कसे म्हणता येईल?, असे प्रश्न उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले. यावेळी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून ५ कोटी खंडणी उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रसारक मंडळांच्या संचालकांमध्ये वाद आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीपासूनतानाजी भोईटे गट आणि नरेंद्र भास्कर पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. यातील भोईटे गटाला गिरीश महाजन यांचा पाठिंबा असल्याची चर्चा होती. या अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे भाऊ अॅड . विजय भास्कर पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने विजय पाटील यांना मारहाण केली. तसेच गिरीश महाजन यांनी एक कोटीची ऑफर दिली, असा आरोप करण्यात आला आहे. २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी ८ डिसेंबर २०२० ला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleप्रदेशाध्यक्ष पदासाठी तरुण नेतृत्वाला संधी द्या,राजीनाम्याच्या वृत्तावर थोरातांनी मौन सोडले
Next articleशिवसेनेचा आणखी एक नेता पीएमसी घोटाळ्याचा लाभार्थी,भाजप नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ