मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भाष्य करतात कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांचे प्रकरण असो किंवा नुकत्याच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विधानाने माजलेली खळबळ असो शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत राज्यातील चालू घडामोडींवर भाष्य केले आहे.शरद पवारांनी विविध विषयांवर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते जाणून घेऊ.
धनंजय मुंडेंबाबतचा आमचा निर्णय योग्य होता
रेणू शर्माने केस परत घेतल्याची बातमी वाचायला मिळाली.आम्हाला प्रथमदर्शनी असे वाटले की, यात सत्यता पडताळण्याची गरज आहे. सत्यता पडताळ्याशिवाय आपण निष्कर्षावर येऊ नये. हा प्रश्न गंभीर दिसतो, असे मी आधीच म्हटले होते.परंतु ज्यावेळी आमच्यापुढे सर्व कागदपत्रे किंवा माहिती आली.त्यावरून याच्या खोलात जाण्याची गरज आहे. त्यामुळे आमचा हा निर्णय बरोबर होता असे आता वाटतेय. आता जे झाले त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर दिली आहे.दरम्यान, रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे सरकार पाच वर्ष चालेल यात काही शंका नाही
महाविकास आघाडी सरकार पडणार असे भाकीत विरोधकांकडून वारंवर केले जातात. मात्र हे सरकार पाच वर्ष चालेल यात काही शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सरकार पाडण्यासाठी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत अखंड प्रयत्न सुरू आहेत. पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे म्हणत शरद पवारांना विरोधकांना फटकारले आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल, असे शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी सरकारकडून सर्वोत्तम वकिलांची नियुक्ती
मराठा आरक्षणाचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशातच सर्वोच्च न्यायालयाने याची सुनावणी आता ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. यावर बोलताना आरक्षण टिकवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे शरद पवारांनी सांगितले. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असून त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. पण, आरक्षण प्रश्नी बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वोत्तम वकील राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. वकिलांमार्फत हे प्रकरण योग्यरित्या मांडून त्याला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे शरद पवार म्हणाले.
राज्यपाल नियुक्त आमदारांवरून पवारांचा टोला
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावावर निर्णय दिलेला नाही.यावर प्रश्न विचारण्यात आला असता पवार म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची सहमती घेऊन राज्यपालांना प्रस्ताव दिल्यानंतर तो आजवर नाकारण्यात आला नाही, असा माझा गेल्या ५० वर्षांचा अनुभव आहे.परंतु इथे काहीतरी वेगळे घडले आहे.बघू आता काय होते ते, असा अप्रत्यक्ष टोला पवारांनी राज्यपालांना लगावला.
केंद्राने सुरक्षा पुरवलेल्यांना आता सुखाने झोप लागेल
राज्य सरकारने मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली असताना आता केंद्राकडून ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. भाजप नेते नारायण राणेंना केंद्राने सुरक्षा पुरवल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला होता. त्यामुळे मंत्र्यांच्या या सुरक्षा व्यवस्थेवरून शरद पवार यांनी भाष्य केले आहे.कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार करून कोणाला किती सुरक्षा पुरवायची याचा निर्णय राज्य सरकार घेते. यामध्ये केंद्राला हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. जी सुरक्षा दिली जाते त्याची नेमकी आवश्यकता काय आहे. संभाव्य धोका किती आहे याचा अभ्यास गृह खात्याचे वरिष्ठ करतात. त्यानंतर राज्य सरकारला सल्ला देतात. आताही तसाच अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार सुरक्षा कमी करण्याचे सरकारला सुचवण्यात आले. माझीही सुरक्षा काढून घेतली होती. मला काही त्याचा त्रास झाला नाही. सुरक्षेची मागणी ज्यांनी केली होती त्यांना केंद्राने ती पुरवली आहे. त्यामुळे त्यांना आता तरी निदान सुखाने झोप येईल, असा चिमटा शरद पवारांनी काढला.
उद्या मला वाटले तर काय करू ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते,अशी इच्छा बोलून दाखवली होती.याविषयी शरद पवारांना विचारले असता, पवारांनी उलट प्रश्न करत उद्या मला वाटले तर काय करू ?,मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही,अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली