मुंबई नगरी टीम
पुणे : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे न घेण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे. दुसरीकडे शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील त्याला पाठिंबा दिला आहे. केंद्राने घेतलेल्या या आडमुठ्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.तर पंतप्रधानांनी मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी,असा सल्लाही अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
अमोल कोल्हे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. गेल्या दीड महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने जी असहिष्णुता दाखवली ती निषेधार्ह आहे, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी केंद्रावर टीका केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात परकीय शक्तींचा हात आहे. केंद्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा प्रकराची सत्ताधाऱ्यांची विधाने ही हास्यास्पद आहेत. देशाचा जो पोशिंदा आहे त्याचा हा आक्रोश आहे. त्यामुळे लोकांना मन की बात सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मन की जी बात आहे ती केंद्राने ऐकायला हवी, असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांचे समाधान व्हावे आणि तोडगा निघाव अशीच सर्वांची इच्छा आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारची अनेकदा चर्चा होऊनही अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानातही शेतकऱ्यांचे लाल वादळ धडकले. राज्याच्या विविध भागातून शेतकरी मुंबईत दाखल झाले. महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला असून त्यात आपला सहभाग देखील दर्शवला.