मुंबई नगरी टीम
पुणे । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सिंधुदुर्गात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला होता.मात्र शाह यांच्या दौऱ्यानंतर वैभववाडीतील भाजपच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली.यासंदर्भात बऱ्याच चर्चा रंगलेल्या असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत पुन्हा सूचक वक्तव्य केले आहे. अमित शाह यांच्या पायगुणामुळे ६ नगरसेवक शिवसेनेत गेले त्याचा काही संबध नाही. अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रात सरकार यायचे असेल तर येईल,असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात आले होते.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.अमित शाह हे सिंधुदुर्गात आले असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र डागले होते.त्यावर शिवसेनेकडून जशाच तसे उत्तर देण्यात आले. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, “अमित शाह यांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा करण्यापेक्षा, शिवसेनेला सल्ला देणे किंवा त्यांना आव्हान केले की सरकार आहे. जुने हिशोब काढत बसण्यात काही कारण नाही,असा तो मुद्दा होता.तरीही शिवसेनेला आणि प्रामुख्याने संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवयच आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवणार, मसनात गेले, कुठे कुठे गेले असे बोलले.
अमित शाह असे व्यक्तिमत्त्व आहे,भाजप एक असा पक्ष आहे कशाला घाबरत नाही.जे आम्हाला म्हणायचे ते आम्ही छाती ठोकपणे म्हणतो. समोरच्याला टाकून बोलणे,लागून बोलणे, ही आमची संस्कृती नाही. एवढा विपर्यास आणि भांडवल करण्याचे कारण नाही”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना लगावला. यावेळी त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत गेलेल्या वैभववाडीतील नगरसेवकांविषयी देखील भाष्य केले. “वैभववाडीमध्ये १७ नगरसेवक हे भाजपचे आहेत. त्यातील ६ जण शिवसेनेत गेले. हे जाणे येणे त्या त्या वेळी होतच राहते. अमित शाह यांच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल आणि वैभववाडीत ६ नगरसेवक गेले याचा काही संबंध नाही.त्यामुळे वैभववाडीचे नगरसेवक गेल्याने महाराष्ट्रात आमचे सरकार येणार नाही, असे होत नाही”,असे सूतोवाच चंद्रकांत पाटील यांनी केले.