मुंबई नगरी टीम
पुणे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.ज्याचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्याची काय एवढी नोंद घेता,असे म्हणत त्यांनी पडळकरांना फटकारले.आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
जेजुरी इथल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार करणार होते. मात्र गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच पुतळ्याचे अनावरण उरकून घेतले. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका देखील केली. याविषयी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,”गोपीचंद पडळकरांना विनाशकाले विपरीत बुद्धी सूचली आहे.ज्याचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात ? उभे राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा आहे का ? प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन पठ्ठ्याचे डिपॉझिट जप्त होते आणि तुम्ही अगदी पत्रकारपरिषदेत मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहात. लोकांनीच त्यांना नाकारले आहे, तुम्ही फार महत्व द्यायचे कारण नाही.” अशा शब्दांत अजित पवार यांनी टोलेबाजी केली.
गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले ?
आहिल्याबाईंचे काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होते. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून गनिमी काव्याने त्याचे अनावरण केले, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करणे ही अपमानास्पद बाब आहे. आहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचे काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत, अशी टीका पडळकर यांनी केली.