मुंबई नगरी टीम
- हा केवळ आत्महत्येचाच प्रकार
- या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत
- चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच
औरंगाबाद । बीड मधील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रतिक्रिया दिली असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.हा केवळ आत्महत्येचाच प्रकार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
बीडची टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर समाज माध्यमात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव या मध्ये घेतले जावू लागल्याने विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणी टीकेची झोड उठवली आहे.याप्रकरणी पुणे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असतानाच काही ऑडिओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आरोप केले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि गृहमंत्री अनिल देशमुख आणखी कशाची वाट पाहत आहेत. ताबडतोब राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीअंती कारवाईची भूमिका घेतली आहे. काही लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने काळजीपूर्वक पावले टाकली जाणार आहेत. या प्रकरणात चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तशीच भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.हा केवळ आत्महत्येचा प्रकार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाणची हत्या नाही तर तो पूर्णपणे आत्महत्येचा प्रकार आहे, असे मुंडे यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आता बोलणे योग्य ठरणार नाही.या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच. एकदा सगळं काही स्पष्ट झालं की त्यावर अधिक बोलता येईल,असेही मुंडे म्हणाले.