वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील कारवाई संदर्भात गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत
  • चौकशी करून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई
  • चौकशीचा संपूर्ण अहवाल समोर आल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय

नागपूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.संजय राठोड यांची चौकशी करून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. विरोधक करत असलेला आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळून लावला. नागपुरात ते बोलत होते.

अनिल देशमुख यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राठोड यांची चौकशी होणार का ? असे विचारण्यात आले. त्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, चौकशी अहवाल आल्यानंतर सत्य निष्पन्न होईल. चौकशीत जे काही होईल ते महाराष्ट्राला माहीत पडेल. नियमानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावर उत्तर देताना चौकशीचा संपूर्ण अहवाल समोर आल्यानंतर राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल, असेही अनिल देशमुख म्हणाले. पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काही तथ्य नसल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलीस दबावात असल्याने कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशी आदेशावर खुलासा

शेतकरी आंदोलनावरून सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली होती. भारतरत्नांची चौकशी करण्याचे आदेश देणाऱ्या ठाकरे सरकारवर भाजपने ताशेरे ओढले होते. चौकशीच्या त्या आदेशाबाबत अनिल देशमुख यांनी खुलासा करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. सेलिब्रिटींचे जे ट्विट्स आहेत त्याबाबतीत भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. लता दीदी या आमच्या दैवत आहेत. सचिन तेंडुलकर यांना भारतातील प्रत्येक व्यक्ती मानतो. त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. भाजपच्या आयटी सेलच्या चौकशीचा आदेश देण्यात आलेला की त्यांनी कोणती स्क्रिप्ट दिलेली का? प्राथमिक चौकशीनुसार भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि १२ इन्फ्लुएन्सरची नावे समोर आली आहेत. पुढील चौकशी रीतसर सुरू आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत ? ‬

दरम्यान भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत असा सवाल त्यांनी करीत संजय राठोड चे संरक्षण करण्यातं तर व्यस्त नाहीत ना ? अशी टीका केली आहे.संपुर्ण राज्याचे डोळे पूजा चव्हाण प्रकरणाकडे लागलेत आणि त्यावर गृहराज्यमंत्र्याची बोटभर ही प्रतिक्रिया नसावी हे आश्चर्यकारक आहे असेही वाघ यांनी म्हटले आहे.

Previous articleटिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले ?
Next articleजयंत पाटील चंद्रकांतदादांना म्हणाले ..हा तर “आयत्या बिळावर नागोबा”