पूजा प्रकरणात नवा गौप्यस्फोट,तीन वर्ष होती भाजपची कार्यकर्ती

मुंबई नगरी टीम

  • पूजाच्या वडिलांनी एका नवा गौप्यस्फोट केला
  • पूजाने पोल्ट्री फार्मसाठी कर्ज घेतले होते
  • संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री नाराज

बीड । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला रोज नवनवीन वळण लागलेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मंत्री सावध भूमिका घेऊन चौकशी अंती समोर येणाऱ्या सत्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे तूर्तास राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र भाजपने हे प्रकरण लावून धरलेले असतानाच पूजाच्या वडिलांनी एका नवा गौप्यस्फोट केला आहे. पूजा ही तीन वर्ष भाजपची कार्यकर्ती होती, अशी माहिती पूजाच्या वडिलांनी दिली आहे.

पूजाच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना या संदर्भात भाष्य केले. पूजावर खूप ताण होता. तिने पोल्ट्री फार्मसाठी कर्ज घेतले होते. यामधे तिचे खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे दुसरे काहीतरी करण्यासाठी आपण पुण्याला जात असल्याचे ती म्हणाली होती, असे वडिलांनी सांगितले. तसेच आत्महत्या केल्याच्या दिवशी दुपारी २ वाजता आपले पूजाशी बोलणे झाले होते. पैसे हवे का असे विचारले असता ती नको म्हणाली होती, असेही ते म्हणाले.

या प्रकरणात अनेकांचे नाव समोर येत असून बरेच खुलासे देखील होत आहेत. यावर विचारले असता ते म्हणाले की, कोणी कोणाचे नाव जोडून काहीतरी सांगत असून हे चुकीचे आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? असा सवालही त्यांनी केला. पूजा प्रकरणाशी अरुण राठोडचे नाव जोडणेही चुकीचे असून त्याचा काही संबंध नाही. माझ्या मुलीची बदनामी थांबवा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. यासह मंत्र्यांचे नाव या प्रकरणात जोडले जाण्यावर ते म्हणाले की, मंत्री असो किंवा अन्य कोणी तपासानंतर नाव समोर येईल व त्यावर कारवाई होईल. मात्र सध्या कोणाचे नाव घेऊ शकत नाही. यावर अधिक बोलताना त्यांनी पूजा ही तीन वर्ष भाजपची कार्यकर्ती होती, असा खुलासा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. मात्र कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. केवळ बदनामी सुरू असल्याचा आरोप वडीलांनी केला आहे.

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री नाराज ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्याने शिवसेनेत अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर शिवसेनेची उच्च स्तरीय बैठक पार पडली होती. या बैठीत राठोड प्रकरणावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विरोधक सातत्याने आरोप करत असून पक्षावरही टीका केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. येत्या काळात मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleअर्थसंकल्पीय अधिवेशन : ८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
Next article१२ आमदारांची नियुक्ती कधी करणार ? हे राज्यपालांनी आधी सांगावे