१२ आमदारांची नियुक्ती कधी करणार ? हे राज्यपालांनी आधी सांगावे

मुंबई नगरी टीम

  • अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार
  • १२ आमदारांबाबत बोलण्यास तयार नाहीत
  • पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल नाही

नागपूर । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार ? असा थेट सवाल केला आहे. यावरून काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची घाई लागली आहे. मात्र ते १२ आमदारांबाबत बोलण्यास तयार नाहीत, असा टोला पटोले यांनी लगावला.

नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपालांनी सरकारला पत्र पाठवले आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांचे जे काही अधिकार आहेत त्यांनी ते करावे. मात्र विधानसभेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या त्यांनी नोव्हेंबरपासून प्रलंबित ठेवल्या आहेत. त्याबद्दलही जनतेला कळवावे, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला. दरम्यान, विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यावर राज्यपालांनी अद्यापही कोणता निर्णय घेतलेला नाही. अशातच राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबाबत राज्य सरकारला पत्र लिहून विचारणा केली आहे. त्यावर आता सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यावेळी नाना पटोले यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पटोले म्हणाले की, पोलिसांत अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. नेमके प्रकरण काय हे समोर येईल तेव्हा काँग्रेस प्रतिक्रिया देईल. तरुणीच्या कुटुंबाकडूनही कुठली तक्रार आलेली नाही.याबाबद्दल माध्यमांतून सगळे ऐकत आहोत.त्यामुळे वस्तुस्थिती पुढे आल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच संजय राठोड यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनत चालली असून लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागले हे त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे संजय राठोड गायब असल्याच्या चर्चेला अजित पवारांनी यावेळी पूर्णविराम दिला.

Previous articleपूजा प्रकरणात नवा गौप्यस्फोट,तीन वर्ष होती भाजपची कार्यकर्ती
Next article‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’, फडणवीसांची नाना पटोलेंवर विखारी टीका