पेट्रोल पंपावर मोदींचा तोंडाबरोबरच डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा

मुंबई नगरी टीम

  • पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा निशाणा
  • नरेंद्र मोदीचे जीवघेण्या महागाईकडे दुर्लक्ष
  • भाजपात ‘संघजिहाद पद्धत सुरु झाली आहे का ?

मुंबई । पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला असताना नरेंद्र मोदी सरकार मात्र त्यातून जनतेला दिलासा देण्याचा कोणताच प्रयत्न करताना दिसत नाही. मोदींनी सत्तेच्या पिचवरून आवेशाने पुढे येत शेवटची लाथ जनतेच्या पेकटात टाकून पेट्रोलचे शतक आवेशपूर्ण व दणदणीतपणे पूर्ण केलेले आहे.जनतेची हार झालेली असून त्यांच्या निवडक उद्योगपती मित्रांची मात्र जीत झालेली आहे. पेट्रोलपंपावर पूर्वी मोदींचा हसरा चेहरा दिसायचा आता कोरोनामुळे त्यांनी तोंडावर पट्टी बांधलेली दिसत आहे. इंधन दरवाढ पाहता आता त्यांनी तोंडाबरोबरच डोळ्यावरही अधिकृतपणे पट्टी बांधलेला फोटो पेट्रोलपंपावर लावावा,अशी खोचक टीका काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

इंधन दरवाढीवर मोदी सरकारचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचे भाव प्रचंड वाढलेले असून जनता त्यात होरपळून निघत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मात्र हात वर करत या जीवघेण्या महागाईकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारच्या कृतीचे प्रतिक स्पष्टपणे दिसण्यासाठी त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेला फोटो पेट्रोल पंपावर लावावा.

पेट्रोल, डिझेलच्या एक्साइज ड्युटीमधून मोदी सरकारने जनतेची लूट करत तब्बल २० लाख कोटींपेक्षा जास्त नफा कमावलेला आहे तर दुसरीकडे उद्योगपतींचे मात्र ८.५० लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केलेले आहे. विजय माल्या, निरव मोदी सारखे बँक लूटेरे परदेशी बसून मजा मारत आहेत आणि बँकांमध्ये घोटाळे वाढतच आहेत. त्याकडे मोदी सरकारचे लक्ष नाही मात्र जनतेची लूट राजरोसपणे सुरु आहे. “जनतेचं कंबरडं मोडलं फार, पेट्रोल झालं सौ पार आणि गेले सहा वर्ष पाहतंय मोदी सरकार,अशी परिस्थिती झाली आहे, असे सावंत म्हणाले.

भाजपात ‘संघजिहाद पद्धत सुरु झाली आहे का ?

भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले हेही आपल्यासमोर असताना भाजपाची प्रगती त्याच्याही पुढे झाली असून उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपात ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपासाठी काही वेगळे प्रावधान केले आहे का ? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की,मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला पक्ष पदाधिकारी पदावर नियुक्ती केली जाते आणि दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपाचे हे वागणे म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असे दिसते. भाजपात तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपाने सुरु केली आहे काय याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असे सावंत म्हणाले.

Previous articleअजितदादांनी मास्क लावू द्या,गॉगल घालू द्या,तरीही त्यांची भाषा ओळखून दाखवेन : मुख्यमंत्री
Next article‘सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ,विपक्ष का नेता तो हुआ’नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला