अजितदादांनी मास्क लावू द्या,गॉगल घालू द्या,तरीही त्यांची भाषा ओळखून दाखवेन : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

  • महाराजांची सांकेतिक भाषा मावळ्यांना कळायची
  • इंगित विद्याशास्त्र. ही भाषा अजितदादांना येते
  • दादांच्या मनात काय चालले आहे हे ओळखून दाखवेन

पुणे । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवनेरीवर शिवजन्मोत्सव पार पडला.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात अनेकांनी भाषणाद्वारे शिवरायांच्या गौरवगाथांना उजाळा दिला.त्याचबरोबर राजकीय टोळेबाजीही पाहायला मिळाली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेल्या एका टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकाला.

त्याचे झाले असे की,आमदार अतुल बेनके यांनी भाषणात म्हटले की,छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या.त्यापैकी एक भाषा म्हणजे डोळ्याने ते मावळ्यांना सांगायचे. त्यांची ही सांकेतिक भाषा मावळ्यांना कळायची.आता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात,असे अतुल बेनके यांनी त्यांचे कौतुक करत म्हटले. याच वक्तव्याचा धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली “छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल आता अतुलजी सांगत होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र. ही भाषा दादांना येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का ? तर दादांच्या मनात काय चालले आहे ते कळले पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या,गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चालले आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाताच एकच हशा पिकला.

“काही गोष्टी अशा असतात की त्याला भाषेची गरज नसते. एखादी गोष्ट करायची ठरवली की, बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या एका जिद्दीने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मी असेन,दादा असतील किंवा संभाजीराजे असतील. राजे तुम्ही कितीही म्हणा राजकारण बाजूला ठेवा. पण तुमच्या आमच्या मनातील शिवप्रेम हा धागा आहे ना, महत्त्वाचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवरायांचा, गडकिल्ल्यांचा इतिहास आपल्या मनात जरी जिवंत असला तरी त्याचे तेज जगापर्यंत पोहोचवायचे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री दिली.

Previous articleस्थानिक प्रशासनाला लॉकडाऊनची मुभा,उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
Next articleपेट्रोल पंपावर मोदींचा तोंडाबरोबरच डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा