‘सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ,विपक्ष का नेता तो हुआ’नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला

मुंबई नगरी टीम

  • नाना पटोले,फडणवीसांमध्ये जुगलबंदी
  • एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय
  • जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली

मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत अभिनेते अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर निशाणा साधला होता. या अभिनेत्यांचे शूटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी पटोले असे वक्तव्य करत असल्याचे म्हटले होते. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’, असा टोलाही फडणवीसांनी लगावला होता. आता पुन्हा नाना पटोले यांनी फडणवीस यांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

नाना पटोले काय म्हणाले ?

“सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.”एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का ? ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली, तर भाजपा नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय ?”, असा सवालही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?

इंधन दरवाढीवर शांत बसलेल्या अभिनेत्यांना नाना पटोले यांनी थेट इशारा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले होते की, “अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी करता अशा प्रकारची व्यक्तव्य केली जातात. अभिनेत्यांबद्दल एखादे वक्तव्य केले तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते हे माहित आहे. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचे काम चालू आहे. याला फार गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. असे कुणीही शूटिंग वगैरे बंद करू शकत नाही. यामध्ये देशामध्ये लोकशाही आहे, असे म्हणत फडणवीस यांनी पटोलेंना सुनावले होते.

Previous articleपेट्रोल पंपावर मोदींचा तोंडाबरोबरच डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा
Next articleराज्यातील महाविद्यालयांत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार : उदय सामंत यांची घोषणा