राज्यातील महाविद्यालयांत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार : उदय सामंत यांची घोषणा

मुंबई नगरी टीम

  • महाराजांचे व्यक्तीमत्व कायम नव्या पिढीसमोर रहावे
  • परिपत्रक येत्या आठवड्यात प्रसिद्ध होणार
  • शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राला,देशाला दिशा मिळाली

पुणे । राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. याच खास दिनाचे औचित्य साधून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे राज्यातील सर्व महाविद्यालयांत शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कायम नव्या पिढीसमोर रहावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले.

मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे.यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सर्व महाविद्यालयांमध्ये राज्याभिषेक (स्वराज्य दिन) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राला, देशाला दिशा मिळाली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व कायम नव्या पिढीसमोर राहावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला”, असे उदय सामंत म्हणाले. यासंदर्भातील परिपत्रक येत्या आठवड्यात प्रसिद्ध होईल,अशी माहितीही दिली.

दरम्यान, आज शिवनेरी गडावर शिवजन्मसोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संभाजीराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे यांसह इतरही नेते उपस्थित होते. कोरोनाचे सावट असल्या कारणाने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरा करण्यात आली.

Previous article‘सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ,विपक्ष का नेता तो हुआ’नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला
Next articleदेव करतो, ते भल्यासाठीच करतो…; धनंजय मुंडेंनी सांगितली ‘ती’ खास गोष्ट