देव करतो, ते भल्यासाठीच करतो…; धनंजय मुंडेंनी सांगितली ‘ती’ खास गोष्ट

मुंबई नगरी टीम

  • सद्यपरिस्थितीला अनुसरून एका राजाची गोष्ट सांगितली
  • देव करतो ते भल्यासाठीच करतो
  • जे होते ते भल्यासाठी होते

बीड । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांत बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आले होते.रेणू आणि करुणा शर्मा यांच्यासोबत असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडे वादात सापडले होते.या सगळ्या घडामोडीदरम्यान धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसले नव्हते. मात्र या सर्व वादावर आता पडदा पडल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या पूर्वीच्याच शैलीत जनतेसमोर येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी काल बीडच्या परळीमध्ये जाहीर कार्यक्रमात सांगितलेल्या एका गोष्टीवरून बरीच चर्चा रंगली आहे.

धनंजय मुंडे यांनी सद्यपरिस्थितीला अनुसरून एका राजाची गोष्ट सांगितली. धनंजय मुंडे म्हणाले की, ‘मला माझ्या आजीने ही गोष्ट सांगितली होती. देव करतो ते भल्यासाठीच करतो. एक राजा असतो. दरबारात बसून तलवार पुसत असतो. राजाचे लक्ष विचलित होते… धारदार तलवारीने त्याचा अंगठा तुटतो. ते बघताच शेजारी उभा असलेला प्रधान म्हणतो की, “राजे देव करतो ते भल्यासाठी”. राजाला राग येतो. राजा प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा ठोठाण्याचा आदेश देतो.

त्यानंतर बऱ्याच दिवसांनी राजा शिकारीला निघतो. सोबत फौज होती. दाट जंगलात फौज मागे पडून राजा एकटाच पुढ जातो. तेव्हा तिथले आदिमानव राजाला पकडतात. ते त्या राजाला त्यांच्या राजाकडे घेऊन जातात. नरबळीसाठी राजाला आणले असल्याचे ते सांगतात. तेव्हा प्रथेप्रमाणे राजाला अंघोळ घातली गेली. त्यावेळी एका वृद्धाला राजाला अंगठा नसल्याचे लक्षात आले आणि तो म्हणाला की याला अंगठा नाही, त्यामुळे हा नरबळी नको. असे म्हणत राजाला सोडून देण्यात येते. राजा राजवाड्यात परतल्यानंतर प्रधानाची सुटका करतो. जंगलात घडलेला सगळा प्रकार राजा प्रधानाला सांगतो. तेव्हा प्रधान राजाला पुन्हा म्हणतो, जे होते ते भल्यासाठी होते. जर तुम्ही मला तुरुंगात टाकले नसते, तर तुमच्यासोबत मी असताना आदिमानवांनी माझा बळी दिला असता. म्हणून सांगतो संजय भाऊ (आमदार संजय दौंड), जे होते ते भल्यासाठी होते’, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Previous articleराज्यातील महाविद्यालयांत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार : उदय सामंत यांची घोषणा
Next articleराज्यात नाईट कर्फ्यू लागणार ? खबरदारी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाउन !