मुंबई नगरी टीम
- मंत्रालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
- महसूल विभागातील २२ कर्मचारी गैरहजर
- दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत अभ्यागतांवर निर्बंध आणण्याची मागणी
मुंबई । राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच ठाकरे मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यातच आज मंत्रालयातील महसूल विभागातील अनेक कर्माचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत मंत्रालयात येणा-या अभ्यागतांवर निर्बंध आणण्याची मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ठाकरे मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने संबंधित कार्यालयातील कर्मचारी चिंतेत असतानाच आज मंत्रालयातील महसूल विभागातील तब्बल ८ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.मंत्रालयाला गेली तीन दिवस सुट्टी असतानाही आजच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागातील २२ कर्मचारी गैरहजर असल्याचे संबंधितांच्या लक्षात आले हे कर्मचारी आजारी असल्याने कामावर आले नसल्याचे सांगण्यात आले मात्र अधिक चौकशी केली असता या २२ कर्मचा-यांपैकी ८ कर्माचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. उर्वरित कर्मचारीही आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या रूग्ण वाढीचा धसका कर्मचारी आणि अधिका-यांनी घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत मंत्रालयात येणा-या अभ्यागतांवर निबंध आणण्याची मागणी केली आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे व त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येतही दरदिवशी दुपटीने वाढ होताना दिसून येत आहे.दुसरीकडे राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात यातील एकाही बाबीचे पालन होताना दिसत नाही.राज्यभरातील विविध भागांतून येणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयात मुक्त प्रवेश आहे. अगदी कोरोना संक्रमित भागातील अभ्यागतांसाठी सुध्दा काहीही निर्बंध नाहीत. येणाऱ्या अभ्यागतांचे शरीराचे तापमान नोंदणे,ते मुखपट्टीचा (मास्क) वापर करतात किंवा कसे, याबद्दल कोणतीही यंत्रणा न ठेवणे, अभ्यागतांचे हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा,व्यवस्था अस्तित्वात नसल्याने मंत्रालयात कोरोनाचा धोका वाढला आहे, पण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांमध्ये सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झालेली असल्याने गेल्या काही दिवसांत मंत्रीमहोदयांसह मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना बाधित झाले आहेत.सदरचा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने केली आहे.