मुंबई नगरी टीम
- प्रसारमाध्यम,समाजमाध्यमातून दाखवले त्यात कसलेही तथ्य नाही
- राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार
- राजीनामा देणार नसल्याचे केले अप्रत्यक्षपणे स्पष्ट
यवतमाळ । बीड मधिल तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षाच्या निशाण्यावर असलेले आणि गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आज मौन सोडले आहे.गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक,राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रकार केला त्यामध्ये कसलेही तथ्य नाही, असे स्पष्ट करीत या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी लावली असल्याचे राठोड यांनी सांगतिले.
पूजा चव्हाण या बीडच्या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्या नंतर समाज माध्यमात व्हायरल झालेल्या ओडियो क्लीप मध्ये असलेल्या आवाजामुळे विरोधी पक्षाने या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.या प्रकरणी विरोधकांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती.मात्र या घटनेनंतर मंत्री राठोड हे प्रसारमाध्यमांसमोर किंवा कुठेही दिसले नाहीत.मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ते गैरहजर होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय वाढू लागला होता.अखेर १५ दिवसांनंतर आज त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले.त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक,राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.पुण्यात तरूणीचा झालेला मृत्यू दुर्देवी असून त्याबद्दल संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे.त्यात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मात्र या नंतर ज्या पद्धतीचे घाणेरडे राजकारण केले गेले ते दुर्दैवी आहे. मी मागासवर्गीय असून ओबीसीचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे.गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सर्वांनी पाहिला आहे, असेही राठोड यावेळी म्हणाले.
राठोड यांचे पोहरादेवीचे मंदीरात आगमन झाले त्यावेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तुफान गर्दी करीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचा चित्र होते.यावेळी समर्थकांनी “कोण आला रे कोण आला,बंजाऱ्यांचा वाघ आला,अशी घोषणाबाजी केली.प्रसारमाध्यमात आणि समाजमाध्यमात जे काही दाखवण्याचा प्रकार केला त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.याची चौकशी लावली असल्याने पोलीस तपासातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील.मात्र गेल्या १० दिवसांपासून बदनामी आणि घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला अशी टीका राठोड यांनी करून, माझं कुटुंब आणि समाजाची बदनामी करु नका,अशी विनंती त्यांनी केली.मी गेल्या १० दिवसात घरी राहून माझ्या कुटुंबाला सांभाळण्याचे काम केले तसेच मुंबईच्या निवासस्थानातून शासकीय कामकाज केल्याचे त्यांनी सांगितले.जे काही सत्य असेल ते चौकशीत बाहेर येईल, असे राठोड म्हणाले.
लोकप्रतिनिधी म्हणून मी चार वेळा निवडून आलो आहे.माझ्यावर माझ्या समाजाचे प्रेम असल्याने अनेक जण माज्यासोबत फोटो काढत असतात. एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका एवढीच विनंती आहे, असे राठोड यांनी सांगितले.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र राठोड यांनी राजीनामा देणार नसल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. आपण आजपासून पुन्हा नियमित कामाला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने त्यातून सत्य काय ते समोर येईलच.त्यामुळे आजपासून मी पुन्हा नियमित कामाला सुरुवात करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.