आरोग्य विभागातील भरतीचा निकाल केव्हा घोषीत करणार ? “या” विभागात पुन्हा परीक्षा

मुंबई नगरी टीम

मुंबई । सार्वजनिक आरोग्य विभागातील ५४ संवर्गातील ३ हजार २७६ पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५१संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेच यासंदर्भात सदस्य विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना टोपे बोलत होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री टोपे म्हणाले,सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड संवर्गाची पदे रिक्त आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पन्नास टक्के पदभरतीला परवानगी दिली आहे. या रिक्त पदांसाठी २८ फेब्रुवारीला ३२ जिल्ह्यातील ८२९ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १ लाख ३३ हजार उमेदवार होते. ही परीक्षा मेसर्स जिंजरवेब कंपनीमार्फत घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान दोन सेंटरमध्ये सोशल डिस्टसिंग पाळले नाही, प्रश्नपत्रिका उशिरा प्राप्त झाल्या, सेंटर वेळेत उघडले नाही, डमी उमेदवारांने परीक्षा दिली, उमेदवार मोबाईल फोन घेऊन आले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जेथे प्रश्नपत्रिका उशिराने पोहोचल्या तेथे वेळ वाढवून देण्यात आला. दोन ठिकाणी पोलीस तक्रार दाखल झाली. औरंगाबादमध्ये पोलीस छाप्यात आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचे काही प्रश्न एका अभ्यासिकेत आढळले त्याचा पोलीस तपास सुरु असून तोपर्यंत या दोन पदांचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे. भाईंदर येथे सुतार या पदाचे १५ उमेदवार परीक्षेसाठी गेले परंतु त्यांची प्रश्नपत्रिका नालासोपारा येथे गेली होती, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

Previous articleमराठा आरक्षणाबाबत केंद्राचा महाराष्ट्राला ‘आत्मनिर्भर’ होण्याचा सल्ला: चव्हाणांची टीका
Next articleभाजपनेच मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले