‘मी येणार,मी येणार’ घोषणा करूनही सत्ता न मिळाल्याने अस्वस्थता: पवारांचा फडणवीसांना टोला

मुंबई नगरी टीम

पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार अशा घोषणा केल्या मात्र पुन्हा सत्ता मिळाली नसल्याने अस्वस्थता आहे, असा टोलाही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.सत्ता गेल्यानंतर काही लोक अस्वस्थ होतात.सगळेच माझ्यासारखे नसतात,अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर प्रहार केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.त्यावर बोलताना पवार म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येणार,मी येणार अशा घोषणा केल्या पण सत्ता मिळाली नसल्याने अस्वस्थता आहे असा असा टोलाही त्यांनी फडणवीसांनी लगावला.सत्ता गेल्यावर काही लोक अस्वस्थ होतात हा नवीन भाग नाही असे सांगून सगळेच माझ्या सारखे नसतात असेही पवार यावेळी म्हणाले.८० साली आमचे सरकार बरखास्त केल्याची माहिती मला मुख्य सचिवांनी रात्री साडे बारा वाजता सांगितली.त्यानंतर लगेच काही मित्रांना बोलवले आणि वर्षावरचे सामान आवरले आणि सकाळी लगेच दुस-या ठिकाणी राहायला गेलो.लगेच दुस-या दिवशी वानखेडे स्टेडियमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत असा क्रिकेटचा सामना होता.तो बघायला गेलो आणि त्या सामन्याचा आनंद घेतला अशी आठवण यावेळी पवार यांनी सांगून, सत्ता येते आणि जाते त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही पण हल्ली सत्ता गेल्याने काही जण फार अस्वस्थ होतात.या त्यांचा काही दोष नाही.विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार अशा घोषणा केल्या पण सत्ता काही आली नाही त्यामुळेच अस्वस्थता आहे अशा शब्दात पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.

पवार यांच्या यावेळी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले.अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत.यापूर्वी राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधिल टीका ही केवळ भाषणापुरती मर्यादित होती.यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती.त्यावेळी अधिवेशनाच्या वेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील चर्चा टोकाची होती.मात्र अशी चर्चा संपताच विरोधक आणि सत्ताधारी एकत्र बसून राज्याच्या हिताच्या विचार करत असत.मात्र सध्या अशा गोष्टी पहायला मिळत नाही.धोरणात्मक टीका करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे मात्र मुख्यमंत्र्यांचे एकेरी उल्लेख करून टीका करणे योग्य नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.मुख्यमंत्री ही संस्था आहे, या संस्थेचा मान ठेवला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.हनुमान चालीसवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना पवार म्हणाले की,राज्यात यापूर्वी असे वातावरण कधीत नव्हते.एखादा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर स्वत:च्या घरी करू शकता.पण असा कार्यक्रम एखाद्याच्या घरा समोर करणार असे सांगितल्यावर त्याबद्दलची अस्वस्थता संबंधिताबद्दल आस्था असलेल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झाली तर त्यांना दोष देता येणार नाही असे सांगून,सध्या सुरू असलेले वातावरण लवकरच शमेल अशी आशा व्यक्त केली.

Previous articleवीज ग्राहकांना दिलासा : सहा मासिक हप्त्यात अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरता येणार
Next articleभोंग्याबाबत सरकार काहीही निर्णय घेऊ शकत नाही ! धार्मिक उत्सव,भजन किर्तनावर काय म्हणाले गृहमंत्री ?