भोंग्याबाबत सरकार काहीही निर्णय घेऊ शकत नाही ! धार्मिक उत्सव,भजन किर्तनावर काय म्हणाले गृहमंत्री ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याने तो संपूर्ण देशाला लागू असल्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेवून संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती होणार नाही असे सांगून,गरज लागल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांना भेटावे आणि त्यातून भूमिका स्पष्ट करावी अशी भूमिका असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही.ज्यांनी भोंगे लावले आहेत.जे भोंग्यांचा वापर करीत आहेत त्यांनीच यासंदर्भात विचार करावा असेही,त्यांनी स्पष्ट केले.मशिदीवरील भोंग्यांसदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.विशेष म्हणजे या बैठकीला भाजपचे नेते उपस्थित नव्हते.

भोंग्याच्या प्रश्नावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.त्यातच येत्या ३ मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा आणि भोंगे काढून घ्या, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री अनिल परब,मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील,बहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील,आमदार प्रणिती शिंदे,आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई,संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर,आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, मार्स्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर,आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई उपस्थित होते.मात्र या बैठकीला भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हते.राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी कारवाई करावी लागेल ती करावी या मतापर्यंत आम्ही आलो आहोत, असे यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदुषणासंदर्भात निर्णय दिला आहे.अन्य काही न्यायालयांनीही निर्णय दिले आहेत.त्याआधारावर महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१७ मध्ये काही शासन निर्णय जारी केले आहेत.आणि त्या आधारे भोंग्याचा वापर,त्याला द्यायची परवानगी,अटी,शर्थी,वेळ आणि आवाजाची मर्यादा किती असावी हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्यात भोंग्यांचा वापर करता येतो.गेल्या काही दिवसात भोंग्यांवरून इशारे दिले जात आहेत.मात्र सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही.ज्यांनी भोंगे लावले आहेत.जे भोंग्यांचा वापर करीत आहेत त्यांनीच यासंदर्भात विचार करायचा आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.राज्यात शांतता,कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे.समाजात तेढ वाढेल,कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत.कायदा सर्वांसाठी समान असून आहे,कुणीही कायद्याचा भंग करु नये.आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल.शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी,राज्यात शांतता,कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी वळसे पाटील यांनी केले.

एखाद्या विशिष्ट समाजासंदर्भात भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम अन्य समाजावर,धार्मिक उत्सवावर काय होईल याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.ग्रामिण गावात रोज भजने, किर्तने व विविध कार्यक्रम सुरू असतात.नवरात्रीचा उत्सव,गणेशोत्सव,यात्रा यावर काय परिणाम होतील यावरही या बैठकीत चर्चा झाली.कायदा समाजासाठी समान आहे असे म्हणताना वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी भूमिका घेता येणार नाही.सर्वांसाठी एकच भूमिका घ्यावी लागेल, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.जे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.त्याच्याच आधारे निर्णय घेतले जात आहेत. यासंदर्भात पोलीस विभागातील अधिका-यांशी चर्चा करून मार्गदर्शक सूचना ठरवणार आहे.त्या मार्गदर्शक सूचना योग्य आहेत की नव्याने काढण्याची आवश्यकता आहे का याचा विचार करण्यात येईल असे सांगून कायदा सुव्यवस्थेचा भंग झाला तर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे वापरण्यास परवानगी आहे.रात्री १० ते सकाळी ६ याच वेळात भोंग्यांचा वापरण्यावर बंदी आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्रसरकार त्यांच्या तर राज्यसरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील.राज्याचा गृहविभाग नियम, कायद्यानुसारच कार्यवाही करेल.कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही.सर्वांना विश्वासात घेऊन,सर्वांच्या सहकार्याने एक चांगला मार्ग निघावा,असा राज्यसरकारचा प्रयत्न आहे.राज्यात शांतता,कायदा-सुव्यवस्था,जातीय सलोखा रहावा,सौहार्दाचे वातावरण बिघडू नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Previous article‘मी येणार,मी येणार’ घोषणा करूनही सत्ता न मिळाल्याने अस्वस्थता: पवारांचा फडणवीसांना टोला
Next articleसोनिया गांधींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर सोपवली मोठी जबाबदारी