सोनिया गांधींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राजस्थान मधील उदयपूर येथे येत्या १३ ते १५ मे दरम्यान काँग्रेसच्या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील राजकीय प्रस्तावाबाबतच्या समितीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला असून, पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. या समितीत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे निमंत्रक तर गुलाम नबी आझाद,अशोक चव्हाण, एन. उत्तम कुमार रेड्डी, डॉ. शशी थरूर, गौरव गोगोई, सप्तगिरी शंकर उलाका, पवन खेरा व डॉ. रागिणी नायक यांचा समावेश आहे. ही समिती चिंतन शिबिरातील राजकीय प्रस्ताव तयार करण्याचे तसेच याबाबतच्या विचारमंथनाचे संयोजन करेल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अलिकडच्या काळात अशोक चव्हाण यांच्यावर सोपवलेली ही दुसरी मोठी जबाबदारी आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम ही चार राज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांना नेमण्यात आले होते.

Previous articleभोंग्याबाबत सरकार काहीही निर्णय घेऊ शकत नाही ! धार्मिक उत्सव,भजन किर्तनावर काय म्हणाले गृहमंत्री ?
Next articleपुरस्कार हा अभिमान आणि शान वाढविणारा असतो : मंत्री उदय सामंत