मुंबई नगरी टीम
मुंबई । मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजपने पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून सभागृह दणाणून सोडले होते.मात्र गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून अन्यत्र बदली करण्यात आली असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला होता.या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकारने कायम प्राधान्य दिले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षात वाढ झालेली नसल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.अशी माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मात्र अगोदर सचिन वाझे प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी लावून धरली.मुंबईतील अँटिलिया या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे करीत आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबासंदर्भातील तपास हा दहशतवादविरोधी पथक करीत आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून अन्यत्र बदली करण्यात आली आहे अशी घोषणा करीत, कुणालाही पाठीशी घालणार नसून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुका ह्या शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या आहेत. गडचिरोली जिल्यातील जवेली खुर्द येथे गेल्या ५४ वर्षांत पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत.गडचिरोलीतील ५३५ गावांच्या ३२५ ग्रामपंचायतींसाठी शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पडल्या असल्याचे देशमुख म्हणाले.