खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार : प्रविण दरेकरांची सरकारवर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई । सचिन वाझेंनीच माझ्या पतीचा खून केल्याचा थेट आरोप मनसूख हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख यांनी पत्राव्दारे केला असून वाझेंविरोधात सकृतदर्शनी भक्कम पुरावे असतानाही ठाकरे सरकार खुन्यांना पाठीशी घालत आहे,असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

विरोधी पक्षाने कायदा व सुव्यस्था या विषयावर दिलेल्या प्रस्तावावर गृह मंत्री अनिल देशमुख विधान परिषदेत उत्तर देत असताना हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. दरेकरांनी असेही सांगितले की,ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जातोय, पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने २० दिवस एफआयआर दाखल करून घेतला नाही, त्यातही असाच वेळकाढूपणा केला, अरुण राठोड आजही गायब आहे, हॉस्पिटलमध्ये भरती झालेली पूजा अरुण राठोड कोण आहे, याचाही अजून पत्ता लागलेला नाही, लॅपटॉपमधील पुरावेही गायब करण्यात आलेले आहेत, पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला.

हिरेन मनसुख प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला वाटत असून महाराष्ट्राची जनतेच्या मनातही हेच प्रश्न आहेत, महाराष्ट्रात खुलेआम हत्या होत असून राज्यातील जनतेचा या महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असलेल्या सचिन वाझेंना तत्काळ अटक करा, अशी मागणी दरेकरांनी केली. याच गोंधळात विधान परिषदेची विशेष बैठक स्थगित करण्यात आली, त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक सुरु झाल्यानंतर दरेकरांनी तीच मागणी पुन्हा लावून धरल्याने प्रश्नोत्तराचा तास देखील स्थगित करण्यात आला.

Previous articleगृहमंत्री अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांनी दाखल केला हक्कभंग
Next articleपोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन नाही तर केवळ उचलबांगडी