गृहमंत्री अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांनी दाखल केला हक्कभंग

मुंबई नगरी टीम

मुंबई । अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. मराठा आरक्षणावर दिशाभूल करणारे निवेदन केल्याबद्दल अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुद्धा त्यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

याबाबत विधान भवन,मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते.वस्तुतः सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदविले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे अभिप्राय आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी आपण सभागृहात केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

मराठा आरक्षणावर आज अशोक चव्हाण यांनी अतिशय दिशाभूल करणारे निवेदन सभागृहात केले, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वस्तुतः १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख हा सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहोतगी यांनी केला होता. केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल यांनी जे सांगितले नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. वारंवार केंद्र सरकारवर टीका करायची आणि आपली जबाबदारी झटकायची, हा प्रयत्न ते प्रारंभीपासून करीत आहेत. १०२ व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यावर २ पाने लिहिली आहेत. मात्र या सर्व बाबी विचारात न घेता ते महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleभाजपनेच मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले
Next articleखुन्यांना पाठीशी घालणारं सरकार : प्रविण दरेकरांची सरकारवर टीका