मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावल्याने अनेक चर्चांना उधाण आले असतानाच जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले असून, परमबीर सिंग यांचे आरोप हे कुणाला तरी खुश करणाच्या उद्देशाने अधिक वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले पत्र हे त्यांची बदली केल्याची प्रतिक्रिया आहे.वाझे प्रकरणी राज्य सरकारने ठोस भूमिका घेतल्याने परमबीर सिंग यांनी हे पत्र लिहिल्याचे स्पष्ट होते.असे सांगून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले .
दरम्यान मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा दावा केला होता.अगोदरच सचिन वाझे प्रकरणात अडचणीत असलेले गृहमंत्री देशमुख यांच्या पुढील अडचणी वाढल्या असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिल्लीला पाचारण केले आहे.आज देशमुख यांच्या प्रकरणी राष्ट्रवादीचे शरद पवार,सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.