केंद्राकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य,४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती.केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.केंद्राने ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात होईल असा निर्णय जाहीर केला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता,सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे.विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो,त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Previous articleवैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग १ ते ४ वर्गातील रिक्त पदे भरणार
Next articleअधिका-यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांकडून सरकारला बदनाम करण्याचे काम