अधिका-यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांकडून सरकारला बदनाम करण्याचे काम

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिका-यांना हाताशी धरून राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस करीत आहे असा आरोप करतानाच फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चूकीच्या पध्दतीने सादर प्रयत्न केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिस दलातील बदल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केल्यानंतर तात्काळ नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेवून फडणवीस यांचे आरोप खोडून काढीत फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली सगळी माहिती चुकीच्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे महाराष्ट्रात पत्रकार परिषदेची सुरुवात शक्यतो मराठीतून केली जाते परंतु फडणवीस यांनी माध्यमांची माफी मागत हिंदीमध्ये सुरुवात केली याची कारणेही वेगळी आहेत असेही मलिक म्हणाले.फडणवीस यांनी शरद पवार चुकीची माहिती देत आहेत असा आरोप केला होता.यावर बोलताना मलिक म्हणाले की,याबाबत गृहमंत्र्यांनी व मीसुद्धा खुलासा केला आहे. आता ते गृहमंत्र्यांच्या हालचालीबाबत माहिती देत आहेत.राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे हालचाल पोलिस रेकॉर्ड सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहित नाही असे सांगून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन त्याची बदली करण्यात आली होती.रश्मी शुक्ला या बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग करत होत्या.राज्यात महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुध्दा टॅप करण्याचे उद्योग या रश्मी शुक्ला यांनी केल्याचा आरोपही मलिक यांनी केला.ज्या पोलीस अधिका-याच्या नावाने सरकार आणि गृहमंत्र्यांवर आरोप केला जात आहे.त्या सचिन वाझेंच्या प्रकरणी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचा माझ्यावर दबाव होता असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याचवेळी त्यांनी खुलासा केला होता की, मी याच्याबाबतीत ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला होता असे सांगतानाच गृहविभागात किंवा ॲडव्होकेट जनरलकडे कुठलाही सल्ला मागवण्याचा एकही कागद नाही असा दावा मलिक यांनी यावेळी केला.

पहिल्या दिवसापासून फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत असून खोटे सांगून सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहेत. सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचा आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या अधिका-यांनी घेतला असल्याने असे सांगून,वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांचा आदेश नव्हता असेही मलिक स्पष्ट केले.मुकेश अंबानी यांच्या घरा समोर ठेवलेल्या गाडी प्रकरणी सचिन वाझे यांची पाठराखण करण्याचे काम सरकारने केले नाही. सचिन वाझे यांना अटक होण्याअगोदर परमवीरसिंग मुंबई आयुक्त असताना त्यांच्या मुख्यालयात तीन तास वाझेला घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते असेही मलिक यांनी सांगितले.मुंबई पोलीस आयुक्त यांची बदली १७ मार्चला होत असताना १६ मार्चला त्यांनी त्यांचे कनिष्ठ अधिकारी संजय पाटील त्याच्याकडून व्हॉटस्ॲप पुरावे तयार करुन स्वतःच्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्या लेटरचा वापर केला आहे असेही मलिक म्हणाले.

परमवीर सिंग हे टीआरपी घोटाळ्याप्रकरणात पुढे पुढे होते मात्र मागील दोन महिने ते शांत होते.त्यांच्यावर कोणता दबाव होता हे माहीत नाही. पण आजच्या घडीला परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले त्यांत त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी वाझे यांना महिन्याला शंभर कोटीचे टार्गेट दिले होते.हा आरोप खोटा असून त्यांनी स्वतः पुरावे निर्माण करुन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेही मलिक म्हणाले. दुसरा मुद्दात डेलकर आत्महत्या प्रकरणात भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा आदेश गृहमंत्र्य़ांनी दिल्याचे म्हटले आहे. मोहन डेलकर यांची आत्महत्या मुंबईमध्ये झाल्यानंतर गुन्हा मुंबईत दाखल होणार की दादरा नगर हवेलीमध्ये होणार याचे उत्तर जनतेला अपेक्षित आहे असेही मलिक यांनी स्पष्ट केले.फडणवीस रश्मी शुक्ला यांची बाजू ज्यापध्दतीने ते मांडत होते. ज्या अहवालाचा संदर्भ देत होते. त्यामधिल ८० टक्के पोलिसांच्या बदल्या झालेल्याच नाहीत असेही मलिक यांनी स्पष्ट केले. भाजपाने कर्नाटकचे सरकार पाडले. उत्तराखंडमध्ये सरकार बदल केला. ईशान्य भारतात सरकार बदल केला. मध्यप्रदेशमध्ये सरकार बदलले. त्यांना महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे कुठलंही सरकार बहुमतात आहे तोपर्यंत सत्तेपासून कुणी दूर करु शकत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला नाही याची आठवण मलिक यांनी करुन दिली आहे.

Previous articleकेंद्राकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य,४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणार
Next articleदेवेंद्र फडणवीस यांच्या वेळी किती बदल्या झाल्या ? याचाही खुलासा झाला पाहिजे