मुंबई नगरी टीम
मुंबई । सचिन वाझे प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे.त्यातच विरोधकांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याने संभ्रम निर्माण झालेला असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा असल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.त्यावर राष्ट्रवादीने खुलासा केला आहे.
“आदरणीय. @PawarSpeaks साहेब आणि मा.@praful_patel जी हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. मात्र एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाहजी यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे.पवार साहेब यांनी अमित शाहजी यांची भेट घेतल्याची बातमी केवळ अफवा आहे. “ -Hon. @nawabmalikncp pic.twitter.com/J5C49M6g4B
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) March 28, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे कंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसून,केवळ अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. गेले दोन दिवस याबाबत ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि दिव्य भास्करमध्ये बातमी करुन या प्रकारच्या बातम्या वाहिन्यांवर प्रसारीत करण्यात आल्या. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे असा आरोपही मलिक यांनी केला आहे.ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत.शरद पवार व प्रफुल पटेल यांनी अमित शहा यांची कसलीही भेट झालेली नाही. आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले.