आरोग्य सुविधा वाढवल्या म्हणता,मग रूग्णांना बेड्स व्हेंटिलेटर्स, औषधे का मिळत नाहीत ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्र्यांनी वाढत्या करोनाच्या बाबतीत ठोस उपाययोजना सांगण्याऐवजी पुन्हा एकदा ‘प्रबोधनात्मक’ संवाद आहे.एका बाजूला इतर राज्याचं मला सांगू नका असे बोलत असताना जगभराची आकडेवारी देण्यामागील त्यांचे प्रयोजन कळलं नाही.आरोग्य सुविधा वाढवल्या असे मुख्यमंत्री सांगत असतील तर मग अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स का मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स, औषधे का मिळत नाहीत, कोरोना रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रुग्णालयाबाहेर का उभे राहावं लागतं व त्यात त्याचा मृत्यू का होतो, याच उत्तर दुर्दैवाने या संवादातून मिळाले नाही अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवादावर टीकास्त्र सोडले आहे.

दरेकर म्हणाले की,मुख्यमंत्री जनतेलाच प्रश्न विचारतात की डॉक्टर कुठून आणणार,नर्सेस कुठून आणणार. परंतु जे कार्यरत आहेत त्यांची काळजी सरकारकडून घेतली जात नाही,त्यांचे पगार वेळेत दिले जात नाहीत. मुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यायचे असतात,पण तेच रुग्णवाढ कशी थांबवायची, असा प्रश्न जनतेला विचारत आहेत. अशा प्रकारे ही सर्व वक्तव्य हताशपणाची वाटतात, नियोजन, समन्वय आणि नियंत्रण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते.त्या ऐवजी त्यांनी माहिती सादर करण्याचे काम केले आहे.कालच्या संवादातुन त्यांनी कुठल्याही उपाययोजना सांगितल्या नाहीत किंवा कोणतेही ठोस निर्णयही जाहीर केले नाहीत. वाढत्या रूग्ण संख्येबाबत मुख्यमंत्र्यांनी कृती केली पाहिजे,अशी खोचक टिका दरेकर यांनी केली.मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.त्याबाबत दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री स्वत:च शेरेबाजी करून विरोधकांवर टीका करत होते. हे राजकारण नाही का ? कोरोना येऊन सव्वा वर्ष झाले, या सव्वा वर्षात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांबरोबर केवळ एकदाच संवाद साधला.हा एक अपवाद सोडला तर मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत विरोधकांशी कधीही चर्चा केली नाही.

लॉकडाऊन संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, कालच्या संवादात मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत जनतेचा अंदाज घेताना दिसले.पण महाराष्ट्रातील जनतेचालॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊन काळात लोकांना काय मदत करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही. राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असे दरेकर यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा सल्ला विरोधकांना दिला होता, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही रस्त्यावर उतरूच. पण तुम्ही मातोश्रीत बसून होतात त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो, आजही करीत आहोत आणि पुढेही करणार आहोत. परंतु, भरमसाठ रुग्णवाढ होत असताना, मृत्यू होत असताना, नियोजनाचा अभाव असताना विरोधी पक्षाने बोलायचे नाही, अशी अपेक्षा असेल तर ते होणार नाही. कारण, जबाबदारी जर सरकारकडून पार पाडली जात नसेल तर विरोधी पक्षाची जबाबदारी आम्ही पार पाडत राहू.

काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याचे कौतुक करून केंद्रावर टीका केली होती. त्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. कारण, पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन केल्यानंतर प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती, त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या. केंद्र सरकारने वीस लाख कोटींचं पॅकेज दिल होतं.मात्र महाराष्ट्र सरकारने एक पैसा नागरिकांना दिलेला नाही.राज्य सरकार म्हणुन आलेलं अपयश लपवण्यासाठी केंद्रावर टीका करून दूर पळण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकरकडून केला जात आहे.

Previous articleकुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही,पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार
Next articleदेवेंद्रजी,नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ? : नाना पटोलेंचा सवाल