मुंबई नगरी टीम
पंढरपूर । राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या पोटनिवडणूकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातल्याने महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली.या निवडणूकीत राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती.राज्यातील महाविकास आघाडीचा दीड वर्षातील कामगिरी आणि कोरोना संकटात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना यावर ही निवडणुक लढवली गेली.या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात भाग घेवून भाजपवर निशाणा साधला होता तर भाजपने राज्यातील आघाडी सरकार कोरोना संकटात सपशेल अपयशी ठरल्याचा प्रचार केल्याने ही निवडणुक अत्यंत प्रतेष्ठेची झाली होती.या निवडणूकीची मतमोजणी आज पार पडली.पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडे यांनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती.पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मते मिळाली.मात्र दुसऱ्या फेरीत भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी घेतली होती.पहिल्या फेरीपासूनच दोन्ही उमेदवार काही मातांनी आघाडीवर होते.सातव्या फेरीपासून समाधान अवताडे यांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली.समाधान आवताडे यांना एकूण १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली तर भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली.या निवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले.भाजपचा विजय हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली . त्यामध्ये मशिनद्वारे २ लाख २४ हजार ९० तर पोस्टाद्वारे ३ हजार ३३१ मतदान झाले. असे एकूण २ लाख २७ हजार ४२१ मतदान झाले होते. त्यापैकी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना एकूण १ लाख ५ हजार ७१७ तर भाजपचे समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली.भालके यांना पोस्टद्वारे १ हजार ४४६ तर आवताडे यांना १ हजार ६७६ मते मिळाली. राष्ट्रवादीसह भाजपाकडून दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या.त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले होते.पोटनिवडणूकीतील या पराभवामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.