मुंबई नगरी टीम
मुंबई । पेट्रोल डिझेल दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय असा घणाघात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका होत असतानाच आता पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केंद्राला टीकेचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत.काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे.जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.