लॅाकडाऊन : राज्य सरकारने ‘या’ वस्तूंची दुकाने उघडण्यास दिली परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात येत्या १ जून पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.राज्यातील काही भागातील वाढती रूग्ण संख्या अटोक्यात येत असतानाच पावसाळ्याच्या तोंडावर आणि नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती,मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने,व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या सागरी किना-यावर गेल्या आठवड्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे.शिवाय येत्या ७ जून नंतर राज्यात पावसाळा सुरू होणार असल्याने वादळामुळे प्रभावित झालेल्या आणि तोंडावर आलेल्या पावसाळ्यात घरे प्रभावित होण्याची शक्यता असल्याने बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने,व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यासंदर्भातील आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत.या निर्णयामुळे बांधकामाशी संबंधीत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

आगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय,छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स,ताडपत्र्या,पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री,दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देण्यात येणार आहे.कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने 13 एप्रिल रोजीच्या ‘ब्रेक द चेन आदेशाद्वारे या बाबींचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे.संबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १० हजाराचा दंड ठोठावण्यात येईल.

Previous article१८ जिल्ह्यात ‘होम क्वारंटाईन’बंद;कोविड केंद्रात अलगीकरण करणार
Next articleमराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपाला शिकवू नका