मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपाला शिकवू नका

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपानेच केले.मराठा समाजाला सदैव फसविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला शिकवू नये,असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षण आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी भाजपावर केलेल्या टीकेचा समाचार दरेकर यांनी घेतला.१९९९ पासून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती.त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम तुमच्या सरकारने केले.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयातही टिकवले.आमचे सरकार होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळे करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे असेही दरेकर म्हणाले.

ज्यांना मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये.मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीने आरक्षण कसे द्यायचे आणि ते कोर्टात कसे टिकवायचे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमले तर आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा असा टोला त्यांनी हाणला.केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले.त्यापाठोपाठ प्रयागराज (अलाहाबाद) येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले. काँग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला हे आधी सचिन सावंत यांनी सांगावे. कधीतरी काँग्रेसकडून आपल्याला आमदारकी मिळेल यासाठी सदैव वाट पाहत या आशेने खुळावलेल्या सचिन सावंत यांनी उगाच खा. छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये असा टोला दरेकर यांनी लगावला.

Previous articleलॅाकडाऊन : राज्य सरकारने ‘या’ वस्तूंची दुकाने उघडण्यास दिली परवानगी
Next articleभाजपला धक्का : सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश