मुंबई नगरी टीम
मुंबई । गोरेगांवमधील सिध्दार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करुन हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुनर्विकासाचे काम कालबद्धरितीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
म्हाडा या प्रकल्पाचा स्वत: विकास करेल.हे करीत असतांना पत्राचाळ येथील मूळ ६७२ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा हिस्सा,इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन त्यांना रितसर गाळयांचा ताबा देण्यात येईल.म्हाडा हिश्यातील सोडत काढलेल्या ३०६ सदनिकांच्या इमारतींची उर्वरित कामे म्हाडाने तातडीने पूर्ण करुन संबंधितांना सदनिकांचा रितसर ताबा देण्यात येईल. संपुर्ण पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडातर्फे पुर्ण करावयाचे असल्याने प्रकल्पाचे काम म्हाडाने सुरु केल्यानंतर रहिवाश्यांचे भाडे देण्याचे दायित्व म्हाडाचे आहे. सबब, यासंदर्भात उचित निर्णय घेण्याबाबत म्हाडास प्राधिकृत करण्यात करण्यात येईल.तसेच मूळ रहिवाशांच्या थकीत भाडयाबाबत म्हाडाने व्यक्त केलेल्या अभिप्रायानुसार कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अंतिम ओदशाची प्रतिक्षा करण्यात यावी. तसेच यानुषंगाने म्हाडाने कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.