ऊर्जा विभागाला पत्र लिहिल्याची ‘ती’ बातमी पूर्णपणे असत्य व चुकीची : नाना पटोले

मुंबई नगरी टीम

मुंबई । उर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहून गंभीर आरोप केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असतानाच ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची दाखवलेली बातमी ही पूर्णपणे असत्य व चुकीची आहे. आपण ऊर्जा विभागाशी संबंधित पत्र लिहिले नसून ते पत्र खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे.आणि या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

वृत्तवाहिनीने दिलेल्या चुकीच्या बातमीचा समाचार घेताना पटोले म्हणाले की,ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची खोटी बातमी दाखवून आमच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, हे जबाबदार वृत्तवाहिनीला शोभणारे नाही. बातमी दाखवण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याच्या साध्या प्रक्रियेचे पालनही केले नाही. अशा प्रकारच्या निराधार, असत्य बातम्या दाखवण्याचे प्रकार भविष्यात होणार नाहीत याची खबरदारी वृत्तवाहिनीने घ्यावी,अशी अपेक्षा व्यक्त करत संबंधित पत्रही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले.

Previous articleशेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा : पीक कर्जाच्या वसुलीस मुदतवाढ
Next articleविधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले