मराठी टक्का कमी करू नका,कष्टाचा ठेवा विकू नका ! : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई । बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते.चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका.तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानावर झाला.त्यावेळी ते बोलत होते.बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते.अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकत्रितपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.बीडीडी चाळीचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णन केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारत आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते.या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृतीची नाळ तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्यांना जन्माला घातले आहे, त्याच ठिकाणी आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच होते, मी त्यांच्याकडे लहानपणी जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले, अनेक विकासाचे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमाफी या शासनाने दिली. समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. तसेच मुंबईतील कोस्टल रोड, स्कायवॉक, मोनोरेल ही कामही वेगाने सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे त्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या असून या पुनर्विकास प्रकल्पातील अडथळे त्यामुळे दूर झाले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या विकासात श्रमिकांचा वाटा मोठा आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे व मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, अनेक क्रांतिकारक, साहित्यिकांसह रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटूही या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्याला होते. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. करारनामा,विस्थापितांचे प्रश्न अशी अशी अनेक आव्हाने होती. परंतु त्यातून मार्ग काढला. पुढील ३६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुमारे तीन हजार पोलिसांना घरे देण्याचे प्रस्तावित असून येथील निवृत्त पोलीस तसेच २०१० पूर्वीपासून ज्यांचे वास्तव्य आहे अशा पोलिसांनाही घरे देण्याचे नियोजन आहे.कामाठीपुरा व कुलाबा येथील झोपडपट्टीचाही समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे.

पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रलंबित विकासकामांची आम्ही माहिती घेतली. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि आज होत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ हा त्याचाच भाग आहे. बीडीडी चाळींना एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे.येथे पुनर्वसनानंतर नवीन इमारती बांधल्या जातील. यातील एका चाळीचे संवर्धन करावे व त्याचे संग्रहालयात रुपांतर करावे .जेणेकरून भावी पिढ्यांना या चाळींचा इतिहास जाणून घेता येईल.येत्या ३६ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पात ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून केवळ घरेच नाही तर इतर सुविधाही देण्यात येणार आहे.

Previous articleराज्यातील १४ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
Next articleपुनर्वसन,अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये कठोर निर्णय घेवून आराखडा तयार करणार