मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील हॉटेल.मॅाल्स व्यावसायिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.मुंबईतील मॉल्सही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र दुसरीकडे राज्यातील धार्मिकस्थळे,नाट्यगृहे आणि थिएटर्स बंदच राहणार आहेत.शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील असणारे निर्बंध मोठ्या प्रमाणात आता हटविण्यात आले आहेत.मुंबईतील मॅाल्स सुरू करण्याबाबत निर्णय घेतला नव्हता तर राज्यातील हॉटेल,रेस्टॉरंट ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. इतर दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली असताना हॉटेल,रेस्टॉरंट मात्र ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी होती.हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून हॉटेल,रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.याबाबत सकारात्म निर्णय घेण्यात आला असल्याने आता येत्या १५ ऑगस्टपासून हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.मुंबईतील मॉल्स रात्री १० वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत.ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.राज्य स रकारने हॉटेल,रेस्टॉरंट बार आणि मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली तरी राज्यातील धार्मिकस्थळे,नाट्यगृहे आणि थिएटर्स मात्र बंदच राहणार आहेत.राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सने विरोध केला असल्याने शाळा,महाविद्यालये पुढील आदेश येई पर्यंत बंदच राहणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
खासगी अस्थापनेतील कर्मचा-यांचे पूर्ण लसीकरण झाले असल्यास अशा कार्यालयांना १०० टक्के क्षमतेने कार्यालये २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगितले. इनडोअर खेळ सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.मात्र खेळाडू आणि जिमखान्यातील कर्मचा-यांनी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.हॉटेल,रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोरोनाचे काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.विवाह सोहळ्यासाठी उपस्थितीमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यापूर्वी विवाह सोहळ्यासाठी ५० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती.आता ती वाढवून २०० करण्यात आली आहे.बंदिस्त कार्यालयात होणा-या लग्न सोहळ्यासाठी हॅालच्या ५० टक्के तसेच १०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.