मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्याला प्राधान्य देत यंदाही दहीहंडीचा उत्सव साजरा होणार नाही.आज झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे अशी टीका करतानाच लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदाना दहिदंडीकरता परवानगी द्यावी,अशी मागणी विरोधकांनी केली आहे तर या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात.त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
दहीहंडीचा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला.काही काळासाठी आपले सणवार,उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्व मिळून जगाला देऊया,संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया,असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे,हे देखील ठाकरे यांनी स्पष्ट केले.बैठकीला उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू अशी भावना व्यक्त केली.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आ. प्रताप सरनाईक, माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, बाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, डॉ.अजित देसाई, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त,पोलीस अधिकारी, दहिहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी,गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,सणवार,उत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो.मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे.या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात.त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.सगळे जग या कोरोनाने त्रासलेले आहे.गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झाली,ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली, त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे.दोन लाटेतला आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटु आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशात पुन्हा निर्बंध लावले जात आहेत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे. हा विषाणू घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. आपल्याकडेही काही जिल्ह्यात दुसरी लाट जोरात आहे. काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा “विंडो पिरियड” आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपले अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण आपली आरोग्य व्यवस्था सक्षम करत आहोत, आपण एकाच दिवशी ११ लाख लोकांचे लसीकरण करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. आपण ऑक्सिजन, आय.सी.यु बेडची संख्या वाढवत आहोत. पण आपली ऑक्सिजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकीच मर्यादित आहेत. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मे.टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्य सरकार हिंदू सणाच्या विरोधात : प्रविण दरेकर
राज्य सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे. कोरोनाचे गांभीर्य सर्वांना आहे, परंतु लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदाना दहिदंडीकरता परवानगी द्यावी,अशी मागणी विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.सण-उत्सवाची परंपरा कायम राखत कोरोनाच्या परिस्थितीची खबरदारी व काळजी घेत हा सण साजरा झाला पाहिजे. लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी. असे झाले नाही तर हे सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे असा संशय बळावत जाईल, अशी टिका दरेकर यांनी केली.राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने जनतेकडून होत असून महाराष्ट्रातील देवदैवत कुलुपात आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून त्यावर उपासमारीची वेळ आली आहे. धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी का उघडली जात नाहीत? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, आधी मंदिरे बंद आता आमच्या सणावरदेखील बंदी का? सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदू सणांचा विसर पडला असल्याची टीका दरेकर यांनी केली.