फडणवीसांच्या स्वबळाची रामदास आठवलेंनी काढली हवा; काय म्हणाले आठवले ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे भाकित माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवले असतानाच फडणवीस यांच्या स्वबळाची हवा खुद्द मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढली आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांचे लोकप्रतिनिधीही निवडून आणू शकत नाही.त्यासाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागेल, असे वक्तव्य आठवले यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे केले आहे.

भाजपच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे या पक्षांचा आवाका कमी होऊन त्यांचा श्वास कोंडला आहे.तर दुसरीकडे भाजपला राज्यभर मोकळा श्वासाने काम करून पक्षविस्ताराची संधी मिळाल्याने आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत येईल असे, भाकित विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी वर्तविले होते.मात्र भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले फडणवीसांच्या मताशी असहमती दर्शवत महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही.राज्यातील काँग्रेस; राष्ट्रवादी काँग्रेस; शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांचे लोकप्रतिनिधीही निवडून आणू शकत नाही.त्यासाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागेल.त्यामुळे रिपब्लिकन पक्ष ही युतीचे राजकारण करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

नाशिकच्या सटाणा नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या भूमीपूजन आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी दगाजी चित्रमंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत आठवले बोलत होते.यावेळी सटाणा नगर परिषदेतर्फे आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.अनेक वर्षांनंतर आठवले सटाणा शहरात आले असल्याने त्यांना भेटण्यास पाहण्यास आणि ऐकण्यास सटाणा, देवळा,बागलाण, नाशिक आणि धुळे येथील त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.१९९८ मध्ये काँग्रेस सोबत युती केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे ४ खासदार लोकसभेत निवडुन आले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी राजकीय निर्णय घेत असतो. केंद्र सरकार मध्ये मी सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे.काश्मीर ते कन्याकुमारी, आसाम पासुन गुजरात पर्यंत संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे असे आठवले यावेळी म्हणाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्कर्षासाठी काम केले मात्र त्यांनी देश घडविण्याचे ही काम केले आहे.नदीजोड प्रकल्प त्यांनी देशाला सुचविला. त्यांनी दामोदर व्हॅली ची निर्मिती केली. विविध जाती धर्माच्या विविध भाषेच्या;गरीब श्रीमंत सर्व वर्गाच्या माणसांना एकत्र जोडणारा समतेचा मार्ग ; राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आठवले म्हणाले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव नाशिक विमानतळाला मिळाले पाहिजे ही आंबेडकरी जनतेची जुनी मागणी असून या मागणीच्या पूर्ततेसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची आपण शिष्टमंडळासह भेट घेऊ असे आठवले म्हणाले.

Previous articleस्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे माझ्या रक्तात नाही : शिंदेंचा राणेंना टोला
Next articleयंदाही दहीहंडीचा उत्सव साजरा होणार नाही