स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे माझ्या रक्तात नाही : शिंदेंचा राणेंना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपार विश्वास दाखवला.मग मी कंटाळण्याचा प्रश्नच येतो कुठे ? असा सवाल करतानाच,’स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही’,अशा शब्दात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची सुरू असलेली जन आशीर्वाद यात्रा काल वसईत पोहचली असता तेथे पत्रकरांशी बोलताना राणे यांनी ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सही पुरते उरले असून त्यांच्या विभागाच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात,शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून, ते लवकरच निर्णय घेतील,असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.नारायण राणे यांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मी कंटाळलो असून,लवकरच निर्णय घेणार,हा जावई शोध राणे यांनी कुठून लावला हे त्यांनाच माहित असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे.माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे आणि पुढेही राहिल असे सांगून,नगरविकास खात्यात कोमाचाही हस्तक्षेप होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली असल्याने त्यांनी जन आशीर्वाद कसा मिळेल याची काळजी घेतली पाहिजे.नाहक कोण नाराज आहे,कोण कंटाळले आहे.यावर बोलून वेळ फुकट घालवू नये असा टोलाही शिंदे यांनी राणेंना लगावला.राज्यातील ठाकरे सरकार भक्कम असून,ते आपला कार्यकाळ सहज पूर्ण करेल असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व भक्कम असून एकनाथ शिंदे तर सोडाच पण एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असे आव्हानही शिंदे यांनी राणे यांना दिले.राणे हे मुख्यमंत्री होते.त्यामुळे कोणत्याही खात्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही.नगरविकास खातेच नव्हे तर कोणत्याही विभागाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊनच घेतले जातात.राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत असा टोला यावेळी शिंदे यांनी लगावला.

Previous articleखा. संभाजी राजेंच्या आडून भाजपचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न; चव्हाणांचा आरोप
Next articleफडणवीसांच्या स्वबळाची रामदास आठवलेंनी काढली हवा; काय म्हणाले आठवले ?