मुंबई नगरी टीम
बारामती । कडक शिस्त अशी ओळख असलेले राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या कॅमेरामॅनला चांगलाच इंगा दावला.कोरोनाच्या संकटावर बोलत असताना या कॅमेरामॅन मास्क खाली आला असल्याचे लक्षात येताच अजितदादांनी आपल्या खास शैलीत या कॅमेरामॅन समाचार घेतला.
बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पणन मंडळाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात त्यांनी आपल्या खास शैलीत सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कामाची स्तुती करीत चिमटेही काढले.बाळासाहेब पाटील यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आम्हालाही त्याचे आश्चर्य वाटले.पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही त्यांना लढा असा आदेश दिला होता असा गौप्यस्फोट पवार यांनी करताच एकच हशा पिकला.साखर प्रश्नावर बोलताना पवार यांनी कोरोनाच्या संकटावर बोलण्यास सुरूवात केली.सर्वांनी मास्कचा वापर करायला हवा,स्वताःबरोबरच इतरांचीही काळजी घ्या असे सांगत असतानाच या कार्यक्रमाचे वृत्तांकन करीत असलेल्या एका कॅमेरामॅनने काही क्षणांसाठी मास्क खाली घेतला असल्याचे अजितदादांच्या लक्षात आले. त्याच क्षणी त्यांनी आपल्या जाहिर भाषणातूनच त्याला मास्क निट घालायला सांगितला, हे सांगतानाच पोलिसांना उचलायला सांगू का ! असा टोलाही त्यांनी त्या कॅमेरामॅनला लगावला.