मुंबई नगरी टीम
सिंधुदूर्ग । राणे आणि शिवसेनेच्या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.बंद दाराआड ही तुमची भाषा आहे.उगाच लावालावी करु नका,असे पत्रकारांना सुनावतानाच,कोणी कोणाला भेटल्याने मला फरक पडत नाही.उलट मी जास्त सुरु झालो आहे.मी कुठेच थांबलो नाही आणि थांबणारही नाही.मवाळ होणं माझ्या राशीत नाही,अशा शब्दात राणे यांनी आपली भूमिका मांडली.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली.या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते.जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी राणे यांना याबाबत माध्यमांनी विचारले असता राणे यांनी यावर भाष्य केले आहे.ठाकरे- फडणवीस यांच्या भेटीबाबत राणे यांना विचारले असता राणे म्हणाले की,बंद दाराआड चर्चा ही तुमची भाषा आहे.त्यामुळे उगाच लावालावी करू नका अशा शब्दात त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सुनावले.राणे एवढेच बोलले नाही तर कोणी कोणाला भेटल्याने मला फरक पडत नाही,उलट मी जास्त सुरू झालो आहे,एवढे होवून कुठेच थांबलो नाही आणि थांबणारही नाही.आणि मवाळ होणं तर माझ्या राशीत नाही अशा शब्दात राणे यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत शिवसेनेचा समाचार घेतला.यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाला.यावेळी राणे यांनी सामनाच्या अग्रलेखावरही भाष्य केले.आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा.संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत हे पहावं असा टोलाही राणे यांनी लगावला. संजय राऊतांमुळे शिवसेना अधोगतीकडे चालली आहे.लोकांमध्ये असणारी शिवसेनेची प्रतिमा खराब झाली आहे. असे सांगतानाच,माझ्या मुलांसोबत बरोबरी करु नका.दोघेही हुशार आणि शिकलेले आहेत, असा इशारा राणेंनी दिला.त्यांनी सामनातून वैयक्तिकपणे हल्ला करणे थांबवले नाही तर मीदेखील प्रहारमधून सुरु करेन.कोण कुठे काय करतो,कोणाच्या कोणत्या केसेस सुरू आहे याची मला माहिती आहे असा इशाराही त्यांनी दिला.कोकणातील यात्रेदरम्यान एकीही शिवसैनिक आडवा आला नाही.कुठे १०-१२ दिसले नाहीत.एखादे पद मिळेल म्हणून राणेंच्या विरोधात बोलावं लागतं असा टोलाही त्यांनी लगावला.