अनिल देशमुख यांची क्लीनचीट सत्य की असत्य ? राष्ट्रवादीने केली ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा ही सीबीआयची जबाबदारी आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यावर नवाब मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये फिरत आहे.हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे असेही मलिक म्हणाले.

या देशात खोट्या बातम्यांचा वायरससारखा फैलाव होतोय.शासनकर्ते सगळी सत्य माहिती देत नाही ती मिडियाने शोधून काढली पाहिजे ही माध्यमांची जबाबदारी असल्याचे देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे असेही मलिक यांनी सांगितले. हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुध्दीने कुठलीही कारवाई होवू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणि ही बातमी खोटी आहे याबाबतचा खुलासा सीबीआयने करावा अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

Previous articleईडीचा अध्यक्ष कोण,बदल्या कशा होतात ? ; सुप्रिया सुळेंची तुफान फटकेबाजी
Next articleकोणी कोणाला भेटल्याने मला फरक पडत नाही ! ठाकरे- फडणवीस भेटीवर राणे गरजले