राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असणारा राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सोपवूनही त्याला मंजूरी मिळाली नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे नेते येत्या दोन-तीन दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

विधान परिषदेतील रिक्त असलेल्या १२ जागांवर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक पक्षांच्या ४ नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात केली आहे.मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी या यादीला मंजूरी दिली नसल्याने राज्यपाल विरूद्ध सरकार असा सामना रंगल्याचे चित्र आहे. याबाबत काही जणांनी न्यायालयातही धाव घेतली आहे.राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयाने राज्यपालांना त्यांच्या अधिकारांची जाणिव करून दिली.तसेच कर्तव्य बजावण्यास आठ महिन्यांचा अवधी पुरेसा असल्याचे मतही नोंदवले.मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत,राज्यापालांना आदेश देण्याचे न्यायालयाला घटनात्मक अधिकार नाहीत, असे स्पष्ट केले. राज्यपाल लवकरात लवकर आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा व्यक्त करीत सरकारचा निर्णय मान्य करणे अथवा नाकारणे हा सर्वस्वी राज्यपालांचा अधिकार आहे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल कोश्यारी एकत्र आले असता यावर तोडगा काढण्याची विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार होते.मात्र राज्यपाल दिल्लीच्या दौ-यावर गेल्याने ही भेट होवू शकली नाही.शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेवून यावर चर्चा केली होती.राज्यपाल कोश्यारी हे उद्या मुंबईत येणार असल्याने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची येत्या दोन-तीन दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर बैठक होणार असल्याचे समजते.गेल्या वर्षभरापासून भिजत पडलेला राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या प्रश्नावर राज्यपाल तोडगा काढण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना भेटीची वेळ दिली जाण्याची शक्यता असल्याने या बैठकीत प्रलंबित असणारा विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्णाण झाली आहे.

कोणत्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

काँग्रेस
१) सचिन सावंत
२) रजनी पाटील
३) मुजफ्फर हुसैन
४) अनिरुद्ध वनगे
राष्ट्रवादी काँग्रेस
१) एकनाथ खडसे
२) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे
४) आनंद शिंदे
शिवसेना
१)उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील
३) विजय करंजकर
४) चंद्रकांत रघुवंशी

Previous articleठाकरे सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर
Next articleदुर्देवाने आज १०० टक्के राजकारण केले जातयं : मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा