मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवून जवळपास २१ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी राज्यातील विविध महामंडळे आणि समित्यांवरील नेमणूका प्रलंबित असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे.या नाराजीचा फटका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये बसू नये म्हणून विविध महामंडळावरील आणि समित्यांवरील नियुक्त्या करून येत्या १५ दिवसात नावांची घोषणा केली जाणार आहेत.
राज्यात भाजपचे सरकार जावून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.या सरकारला सुमारे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यास आला असला तरी राज्यात असलेल्या विविध महामंडळावरील नियुक्त्या रखडलेल्या आहेत.यामुळे तिन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे समजते.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये म्हणून महामंडळावरील नियुक्त्या येत्या १५ दिवसात करण्यात येवून त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नेते,मंत्री आणि आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.जवळपास तीन तासांहुन अधिक चाललेल्या बैठकीत निवडणुका, पक्षबांधणी,महामंडळावरील नियुक्त्या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.मुंबई, ठाणे, पुण्यासह १७ महानगरपालिका,27 जिल्हा परिषदा ३०० नगरपालिका, २९५ पंचायत समित्या आणि २१ जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे,त्यामुळे पवार यांनी मंत्र्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.