राज्यसभेसाठी १० जूनला मतदान; छ.संभाजीराजेंच्या घोषणेमुळे निवडणुकीत चुरस

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रातील ६ जागांसह देशातील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.राज्यातील रिक्त झालेल्या या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे.भाजपचे पियुष गोयल,विकास महात्मे,विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह काँग्रेसचे पी. चिदंबरम शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांची राज्यसभेतील मुदत संपली आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने येणार आहेत तर स्वराज्य संघटनेची घोषणा करणारे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केल्याने या निवडणुकीत रंगत येणार आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले भाजपचे पियुष गोयल,विकास महात्मे,विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह काँग्रेसचे पी. चिदंबरम शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांची राज्यसभेतील मुदत संपली आहे.त्यामुळे या रिक्त झालेल्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने येणार आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २४ मे रोजी या निवडणुकीचा अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून,अर्जांची छाननी १ जून रोजी करण्यात येणार आहे.तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३ जून असून,१० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात आणि राज्याबाहेर शिवसेना वाढीसाठी झटणारे संजय राऊत यांनी शिवसेनेकडून पुन्हा संधी दिली जावू शकते.देशपातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांनाही पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.तर भाजपकडून केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले जाईल.या रिक्त होणा-या सहा जागांपैकी एका जागेवर स्वराज्य संघटनेची घोषणा करणारे छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत रंगत येण्याची चर्चा आहे.मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, जे २९ अपक्ष आमदार आणि लहान पक्ष आहेत, तुम्ही मोठे मन दाखवा आणि मला समर्थन द्या, मी तुम्हाला भेटायला येणार आहे, सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत मला राज्यसभेवर पाठवावे, मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेतील मुदत संपत असलेले महाराष्ट्रातील ६ खासदार
१. पियुष गोयल ( भाजप)
२. पी. चिदंबरम ( काँग्रेस )
३. प्रफुल पटेल ( राष्ट्रवादी )
४. विकास महात्मे ( भाजप)
५. संजय राऊत ( शिवसेना )
६. विनय सहस्त्रबुद्धे ( भाजप)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम
अधिसूचना – २४ मे २०२२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ मे २०२२
अर्जांची छाननी -१ जून २०२२
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ३ जून २०२२
मतदान – १० जून २०२२
मतदानाची वेळ -सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी -१० जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता

Previous articleयाला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे ? नाना पटोलेंच्या ‘त्या’ पत्राने खळबळ
Next articleसंजय राऊत यांनी देशाची नव्हे, महाराष्ट्राची काळजी करावी; प्रविण दरेकरांचा टोला